
दुचाकीवरून रस्ते तपासा; गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवा
शहर अभियंते अनिरुद्ध पावसकर यांचे पथ विभागाला आदेश; ‘आता तरी पालिका जागी होणार का?’ नागरिकांचा परखड सवाल
पुणे : पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पडलेले जीवघेणे खड्डे, तुटलेली चेंबर्स आणि पदपथांवरील अतिक्रमणांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. या खड्ड्यांमुळे आतापर्यंत पुणे शहरात तीन आणि हडपसर परिसरात तीन, अशा एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे “आता तरी महापालिका जागी होणार का?” असा परखड सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी शहर अभियंते अनिरुद्ध पावसकर यांनी पथ विभागातील अभियंत्यांना दुचाकीवरून प्रत्यक्ष रस्त्यांची पाहणी करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. परिमंडळ क्रमांक एक ते पाचअंतर्गत क्षेत्रीय कार्यालयांतील पथ विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दररोज सकाळी ९.४५ ते ११.४५ या वेळेत किमान दोन तास दुचाकीवरून पाहणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
आता अधिकारी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरणार का?
हडपसर, महमंदवाडी रोड, हांडेवाडी रोड तसेच महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये अनेक रस्त्यांची अवस्था बिकट आहे. मोठमोठे खड्डे, तुटलेली चेंबर्स आणि अतिक्रमणांमुळे वाहनचालकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
त्यामुळे कनिष्ठ अभियंत्यांपासून कार्यकारी अभियंत्यांपर्यंतच्या अधिकाऱ्यांनी दुचाकीवरून प्रत्यक्ष रस्त्यावर फिरावे, खड्डे स्वतः पाहावेत आणि ठिकाणनिहाय अहवाल सादर करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
कागदी अहवाल नको; खड्डे बुजलेले दिसले पाहिजेत!
गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविण्याचे आदेश देण्यात आले असले तरी केवळ कागदोपत्री कार्यवाही करून प्रश्न सुटणार नाही. खड्ड्यांची प्रत्यक्ष पाहणी, छायाचित्रांसह नोंद आणि त्यानंतर तातडीने दुरुस्ती, अशी कार्यवाही होणे अपेक्षित आहे.
जीवघेण्या खड्ड्यांमुळे सहा जणांचा मृत्यू झाल्याचा दावा असताना आणखी किती बळी गेल्यानंतर महापालिका जागी होणार? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
“दुचाकीवरून फिरा, खड्डे स्वतः पाहा, अहवाल द्या आणि गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करा. आदेश कागदावर नकोत; त्याची अंमलबजावणी रस्त्यावर दिसली पाहिजे,” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

