
पुणे महापालिकेतील नोकरीच्या आमिषाने ३०.५० लाखांची फसवणूक
पुणे :
पुणे महापालिकेत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत बेरोजगार तरुणांची सुमारे ३०.५० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी महापालिकेत विविध पदांवर नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत फिर्यादीकडून टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम स्वीकारली. विश्वास निर्माण करण्यासाठी काही काळ पगार जमा केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात नोकरी न देता फिर्यादीची आर्थिक फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात शिवानंद बाळासाहेब पाटील, राजेंद्र बबनराव खेडेकर, संजय अनंता भालेराव, अमित दारवटकर, आनंद लोंढणवार आणि अमित सुहास देशपांडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, आरोपींनी नोकरीच्या नावाखाली विविध टप्प्यांत रक्कम स्वीकारली. एकूण ३० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, यापूर्वीही अशाच प्रकारच्या तक्रारी समोर आल्याने कथित नोकरी घोटाळ्याची व्याप्ती वाढत असल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार संघटित स्वरूपाचा आहे का, याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

