CID मधील अभिनेता आदित्य श्रीवास्तव म्हणतो…..
क्लासिक क्राइम ड्रामा CID सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर परतत आहे, ज्यामुळे अनेक लोकांच्या जुन्या आठवणी चाळवल्या आहेत. दोन दशकांपेक्षा जास्त काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ही मालिका आता या वाहिनीवर दर शनि-रवी रात्री 10 वाजता प्रसारित होत आहे. या मालिकेत शिवाजी साटम, आदित्य श्रीवास्तव आणि दयानंद शेट्टी हे लोकप्रिय त्रिकुट अनुक्रमे ACP प्रद्युमन, सीनियर इन्स्पेक्टर अभिजीत आणि दया यांच्या रुपात पुन्हा एकत्र आले आहे. आदित्य श्रीवास्तव म्हणजे सीनियर इन्स्पेक्टर अभिजीतच्या मुलाखतीत त्याने त्याची व्यक्तिरेखा, नव्या सीझनसाठी शूटिंग करण्याचा अनुभव आणि या नवीन सीझनमध्ये या शोच्या चाहत्यांसाठी काय काय आहे, याविषयी दिलखुलास गप्पा मारल्या.
या मालिकेचा वारसा आणि भारतीय टेलिव्हिजनवरील या मालिकेचा प्रभाव याबद्दल तुला काय वाटते?
CID च्या वारशाचा मला नितांत अभिमान वाटतो. CID ने प्रेक्षकांशी कीती घट्ट नाते जोडले आहे, हे पाहताना मी नतमस्तक होतो. या मालिकेचा परिणाम, त्यात आम्ही जे प्रकरण सोडवतो, तेवढ्या पुरताच मर्यादित नसून मालिकेतील पात्रे, त्यांची नाती आणि प्रेक्षकांशी जवळीक साधण्याची त्यांची पद्धत हे सगळे प्रेक्षकांना भावले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून CID हे नाव घराघरात पोहोचले आहे. त्यातील व्यक्तिरेखा, त्यांचे अद्याप वापरले जाणारे संवाद प्रेक्षकांच्या मनात रुतून बसले आहेत. हा सांस्कृतिक प्रभाव या मालिकेची ताकद आहे.
नवीन सीझनचा पहिला भाग प्रसारित झाला तेव्हा तुला काय वाटले? जुन्या दिवसांच्या आठवणी मनात जाग्या झाल्या का?
हे शब्दांत सांगणे कठीण आहे, पण इतक्या वर्षांनी CID चे पडद्यावर पुनरागमन होताना बघणे हा आम्हा सर्वांसाठीच एक भावुक करणारा क्षण होता. जुन्या मित्रांना भेटल्याचा आनंद आम्हाला झाला. पहिला एपिसोड प्रसारित झाला, तेव्हा मला हे जाणवले की, या शोमध्ये कीती स्थित्यंतर आले आहे, पण त्याच वेळी, त्यातील मूळ गाभा मात्र तोच आहे. नव्या पिढीचे प्रेक्षक ही मालिका बघत असल्याचे पाहून खूप बरे वाटले. त्यामुळे हे पुनरागमन विशेष महत्त्वाचे आहे.
मधल्या विश्रांतीनंतर पुन्हा अभिजीतच्या भूमिकेत शिरणे तुझ्यासाठी सोपे होते का? की, या व्यक्तिरेखेचे काही पैलू पुन्हा नव्याने शोधावे लागले?
ही अशी व्यक्तिरेखा आहे, जी माझ्या मनात, शरीरात आणि आत्म्यात भिनली आहे. इन्स्पेक्टर अभिजीतला इतकी वर्षे जे प्रेम आणि कौतुक मिळाले आहे ते धन्यता देणारे आहे. मी जेव्हा पुन्हा या भूमिकेत शिरलो, तेव्हा असे वाटलेच नाही की एका विश्रांतीनंतर आपण हे करत आहोत. अगदी कालच तर एक एपिसोड केला होता आणि उद्याच्या एपिसोडसाठी आपण काम करत आहोत, असेच वाटले.
जुने प्रेक्षक आणि नवीन पिढीचे प्रेक्षक या दोघांना CID आवडेल का? तुला काय वाटते?
आमच्या समस्त टीमने एकच लक्ष्य नजरेसमोर ठेवून काम केले आहे – सर्वांचे मनोरंजन झाले पाहिजे! मग ते आजी-आजोबा असोत, त्यांची नातवंडं असोत, भावंडं असोत, सासरची मंडळी असोत, मित्र असोत किंवा गृहिणी. सर्वांना एकत्र बसून ही मालिका बघता यायला हवी. जेन-झी साठी आम्ही काही नवीन शब्द, कल्पना आणि सादरीकरणाची शैली दाखल करत आहोत. आणि आम्हाला अपेक्षा आहे की, त्यांना ते आवडेल. आमच्या समस्त टीमला ही जाणीव आहे की काळ खूप बदलला आहे,
अभिरुची बदलली आहे आणि नवीन प्रेक्षकवर्ग समोर आहे. मालिकेचा मूळ गाभा तसाच ठेवून नवीन गोष्टी अंगिकारण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत.
अभिजीत आणि दया यांच्यातील नात्याचे CID च्या चाहत्यांनी नेहमी कौतुक केले आहे. तुम्हा दोघांमधील तसेच क्षण आम्हाला पुन्हा बघायला मिळतील का?
मी त्याला अगदी सुरुवातीपासून, एक अभिनेता म्हणून मोठा होताना बघितले आहे. त्याच्यात झालेले बदल मी पाहिले आहेत आणि तो खूप नैसर्गिक आहे.
त्याच्यासोबत काम करताना खूप मजा येते. पडद्यावर आमच्यात जी मैत्री दिसते, तशीच खरीखुरी मैत्री आमच्यात आहे. आमचे जणू एकच कुटुंब आहे. या मालिकेत आम्ही 20 वर्षे एकत्र काम केले आहे. आम्ही इतकी वर्षे एकमेकांसोबत राहू शकलो, कारण आम्हाला एकमेकांची सोबत आवडते. एकमेकांसोबत वेळ व्यतीत करणे आवडते.
आमच्या कामाबाबात आम्ही सगळे खूप गंभीर आहोत आणि स्टारडमची आम्ही पर्वा करत नाही. आमच्या कामाशी आम्ही एकनिष्ठ आहोत आणि एकमेकांबद्दल आम्हाला आदर आहे. त्यामुळेच इतका प्रदीर्घ काळ आम्ही एक टीम म्हणून काम करू शकलो.
CID चे निष्ठावान चाहते आहेत. तुमच्या चाहत्यांकडून आलेल्या अशा काही प्रतिक्रिया किंवा संदेश आहेत का, जे तुमच्या लक्षात राहिले आहेत?
असे अनेक लोक आहेत, विशेषतः लहान मुले, जी आम्हाला सांगायची की, CID बघितल्यानंतर त्यांना पोलीस दलात जाण्याची प्रेरणा मिळाली. अनेक लोकांना आम्ही फॉरेन्सिकचा परिचय करून दिला. त्यावेळी लोकांना त्याविषयी फारशी माहिती नव्हती. अनेक मुलांना फॉरेन्सिक सायन्समध्ये रुची निर्माण झाली आणि पुढे त्यांनी अभ्यासासाठी आणि करकीर्दीसाठी तो विषय निवडला. अनेकदा असे होते की, चाहत्यांना वाटू लागते की, आम्ही खरोखरच पोलीस खात्यात काम करतो. असे अनेकदा झाले आहे की, लोक त्यांच्या वैयक्तिक समस्या घेऊन आमच्याकडे येत आणि ती सोडवण्याची आम्हाला विनंती करत.
दिल्ली विमानतळावर घडलेला एक प्रसंग मला आठवतो. एक महिला माझ्याकडे आली आणि तिने सांगितले की तिची पर्स चोरीस गेली होती. तिला माझी मदत हवी होती. मी तिला सांगितले की आम्ही शोमध्ये जे काही करतो, ते वास्तवापेक्षा वेगळे असते.
पण मी तिला CCTV फूटेज तपासायला सांगून मदत केली. मी तिला गुन्हा नोंदवायला सांगितले, कारण CCTV मध्ये सारे काही रेकॉर्ड होत होते. तर, अशा प्रकारच्या परिस्थितींमध्ये मी शक्य तशी मदत केली आहे.
बघत रहा, CID दर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!