Blog

समोरासमोर झालेल्या धडकेत दोन भाविकांचा मृत्यू

जेजुरी – पुणे पंढरपूर मार्गावरील जेजुरी जवळ असलेल्या बेलसर फाट्या वर दोन वाहनाच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन भाविकांचा मृत्यू तर ११ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

जेजुरीला खंडोबा देवाच्या देवदर्शनासाठी हे भाविक निघाल्याची माहिती आहे. यामध्ये जितेंद्र ज्ञानेश्वर तोत्रे (वय ३५ रा. कुरवंडी ता. आंबेगाव) आणि भाविक महिला आशाबाई बाळकृष्ण जरे (वय ५० रा. जरेवाडी ता. खेड) अशी मृत्यू झालेल्या भाविकांची नावे आहेत. या अपघाताची माहिती सागर दत्तात्रय तोत्रे (रा. कुरंगवाडी ता. आंबेगाव) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर तोत्रे हे आपल्या चुलत भावाचा अशोक लेलंड कंपनीचा छोटा हत्ती टेम्पो घेऊन आपल्या नातेवाईकांसह जेजुरीला सोमवती यात्रेनिमित्त देवदर्शनासाठी येत होते. काल मध्यरात्री नंतर अडीच वाजण्याच्या सुमारास उरुळीकांचन मार्गे बेलसरहून जेजुरीकडे जात होते. जेजुरीहून उरुळी कांचन कडे जाणाऱ्या टाटा कंपनीच्या टेम्पोने समोरून जोरदार धडक दिली.

समोरासमोर झालेल्या धडकेत छोटा हत्ती चालक जितेंद्र ज्ञानेश्वर तोत्रे आणि भाविक महिला आशाबाई बाळकृष्ण जरे हे दोघे जण मृत्युमुखी पडले. तर मंगल तोत्रे, ज्ञानेश्वर तोत्रे, राहुल तोत्रे, अनुष्का तोत्रे, तानाजी तोत्रे, विलास तोत्रे, बाळू तोत्रे, अश्विनी तोत्रे, मीरा करंडे, ओंकार करंडे, बाबाजी करंडे हे गंभीर जखमी झाले आहेत.

बेलसर हद्दीतील स्थानिकांनी या अपघाताची माहिती जेजुरी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना उपचारासाठी जेजुरीतील खासगी दवाखान्यात दाखल केले. त्याचबरोबर टेम्पो चालक शांताराम भिकोबा पवार (वय ५०) रा. वडाची वाडी वाल्हे ता. पुरंदर यांस ताब्यात घेतले आहे. पुढील तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे सपोनि. दिपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील करीत आहेत

Related Articles

Back to top button