श्री यमाई देवी यात्रा , औंध
श्री यमाई (मूळपीठ )देवी औंधचा वार्षिक यात्रा महोत्सव शाकंभरी पौर्णिमा सोम दि १३ जाने व दुसऱ्या दिवशी मंगळ १४जाने रथोत्सव असा साजरा होत आहे.
त्यानिमित्ताने –
श्री यमाई देवी (मूळपीठ ) यात्रा औंध दरवर्षी पौष पौर्णिमा अर्थात शाकंभरी पौर्णिमेपासून पुढे सुमारे १५ दिवस साजरा होते. अनेक भक्तांच्या उपस्थितीत हा उत्सव साजरा होतो. श्री यमाई मंदिर हे चालुक्य काळातील प्राचीन मंदिर आहे.पालीची यात्रा संपन्न झालेवर परंपरने लोक औंध यात्रेला चालत येत असत. त्यांना कर्नाटक, दक्षिण महाराष्ट्र व इतर भागांतूनआलेल्या लोक मिळत, भाविकांचे मांदियाळेमुळे यात्रा अधिकच वृद्धिंगत होते.
पौष पौर्णिमेस अर्थात शाकंभरी पौर्णिमा या दिवशी श्री मुळपीठभवानी यमाई देवीचा छबिना अर्थात पालखी सोहळा असतो तर पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी देवीचा रथ उत्सव असतो.
दंतकथेप्रमाणे पौष पौर्णिमेला संध्याकाळी देवी युद्धासाठी बाहेर पडली त्याची आठवण म्हणून देवीचा छबिना काढला जातो .तर दुसऱ्या दिवशी राक्षसाला ठार मारल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ देवीचा रथोत्सव असतो.
यमाई देवी हे शिवशक्ती पीठातील एक महत्त्वाचे स्थान आहे.यमाई देवीची महाराष्ट्रात आणि बाहेरही अनेक पीठे आहेत, त्या पिठांचे मूळस्थान म्हणून औंधचे श्री यमाई मूळपीठभवानीदेवी स्थान ओळखले जाते.
मंदिर स्थापत्य शास्त्रात शैवपंथाच्या अनेक खुणा सापडतात .चालूक्य काळात, देवगिरीच्या शिंगण यादव काळामध्ये महाराष्ट्रभर शैवपंथाचा मोठा प्रभाव होता. शैव पंथातील गुरव पुजारी दरबारी असत. शैव विचारांचे सल्लागार राजदरबारी असत.आजही महाराष्ट्रभर शिव व शिवप्रभावळीतील देवतांच्या मंदीरात पूजाअर्चा त्यांचेकडे परंपरेने चाललेले दिसून येते. चालुक्य राजा पुलकेशी दुसरा हा देवभक्त असून त्याचे काळात अनेक मंदिरे विकसित झालेली दिसून येतात.
औंध मधील श्री देवीची विविध रूपे- चंडिका दुर्गा कालिका अशा विविध रूपात भवानी जगदंबा अवतरली आहे औंध मधील यमाई देवीच्या रूपात पाच मुख्य रूपे दिसून येतात औंधासुराबरोबरील युद्धामध्ये सहाय्य करण्यासाठी देवगणांनी भवानीमातेस येमाई अशी हाक मारली म्हणून देवी यमाई हे नाव पावली.
औंधासुरावर आक्रमण करताना देवी मयूरवाहिनी झाली होती, यास्तव देविस मयुरवाहिनी अर्थात मोरालाई हे नाव पडले. युद्धामध्ये देवीच्या ही अंगावर बऱ्याच जखमा झाल्या होत्या. त्या जखमांचा दाह कमी करण्यासाठी देवीने तळ्यात आपले केस मोकळे सोडून स्नान केले. देवीच्या या स्वरूपात मुक्तकेशीनि मोकळाई नाव पडले. रामाची परीक्षा घेणार तिचं प्रसिद्ध रूप यमाई व तळ्याजवळील तुकाई रूप आणि मूळपीठगडावर स्वयंभू स्वरूपात वास करणारी मूळपीठनिवासनी यमाई ही देवीची रूपे प्रसिद्ध आहेत.
पौष पौर्णिमेस रात्री देवीचा छबिना असतो या पालखी सोहळ्याच्या वेळी यमाई मंदिरासमोरील भव्य दीपमाळ प्रज्वलित केली जाते.
ही दीपमाळ सुमारे पाचशे वर्षांपूर्वीची जुनी असून ती महाराष्ट्रातील सर्वात उंच दगडी दीपमाळ आहे .औरंगजेब व अफजलखान यांच्या औंध स्वारीतील इतिहासाची ती साक्षीदार आहे.
छबिना व रथोत्सव या दोन्ही बाबीसाठी कर्नाटक व दक्षिण महाराष्ट्रातून अनेक लोक यात्रेस येतात कोल्हापूर ,सांगली,सोलापूर, बेळगाव भागातून विशेषतः लिंगनूर, खटाव ,ऐनापूर, मदभावी , अथणी, दिघेवाडी, जत, बिळुर ,कवठेमंकाळ, विजापूर पर्यंत परिसरातील अनेक लोक देवीस येतात. त्यांच्या उदोs बोला उदो s, या जयघोषात मध्ये रथ व पालखी ग्रामप्रदक्षिणा घालतात.यात्रेच्या या कार्यक्रमानंतर जनावरे व लोकांची जत्रा सुरू होते चंद्राच्या कलेप्रमाणे पंधरा दिवस ती वाढत जाते औंधचे नागरिक व भाविक यांना ही पर्वणीच असते.
या काळामध्ये कुस्ती, क्रिकेटस्पर्धा, श्वानस्पर्धा, बॉक्सिंग ,शरीरसौष्ठव या प्रकारच्या विविध लोकं रंजनासाठी स्पर्धेचे आयोजन होते.
एकूणच औंधच्या या सर्व धार्मिक यात्रा व जत्रेचा लाभ औंध पंचक्रोशीतील छोट्या-मोठ्या गावांना आबालवृद्धांना होत असतो भक्तजना पासून सर्वांसाठीच हे भक्तीपर्व आनंदपर्व असते.
प्रत्यक्ष यात्रा दिवस
_ पौष पौर्णिमेच्या सायंकाळी साडेसातच्या दरम्यान श्री यमाईचे देऊळ पुजारी, यमाईउत्सव मूर्तीची सालंकृत पूजा बांधतात. संस्थानकाळापासून पंत प्रतिनिधी यांचे आगमन सोहळ्यास होते. त्यांच्या दर्शनानंतर प्रत्यक्ष पालखी सोहळा सुरू होतो. पालखी मंदिराच्या बाहेर पडताच श्रींची भव्य दीपमाळ पेटवली जाते व छबिना सुरू होतो .पालखीसोहळ्या बरोबर श्रींचे सालकरी पाच पुजारी ,मानकरी, वाजंत्री तेलभुते व असंख्य भाविक असतात. पालखी ग्रामप्रदक्षिणा घालते घरोघरी देवीचं औक्षण व ओटीभरण केले जाते. गाव मारूती, श्री मोकळाई श्री तुकाई या मंदिराकडून पालखी सोहळा जातो. श्रीदेवी पुन्हा मंदिरात स्थानापन्न होते.
रात्री पादप्रक्षालन, नैवेद्य, धुपारती करून पुजारी श्रींना मुखवस्त्र देतात. मंदिर बंद होते.
पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पहाटे मंदिर उघडले जाते. भूपाळी काकडा ,महापूजा याने दिवस सुरू होतो. आठ वाजता आरती होते. दुपारी गुरव पुजारी श्रींची सालंकृत पूजा बांधतात. पंतप्रतिनिधी यांची दर्शनानंतर पुन्हा उत्सव मूर्ती रथाआरूढ होऊन ग्रामप्रदक्षिणा घालते. उदो बोला उदो जयघोष करीत भाविक रथावर गुलाल उधळतात. रस्त्यावर भाविक देवीचे दर्शन घेतात .रथावर असलेल्या देवीसोबत मानाची सालकरी पाचपुजारी असतात ते भाविकांच्या दर्शनाला मदत करतात. मोकळाई देवी यमाई देवीची भेट हा या दिवसाचा आणखीन एक महत्त्वाचा कार्यक्रम.
त्यानंतर देवी पुन्हा रथारूढ होऊन मंदिरात येते. लळीत व आरती सह कार्यक्रमाची सांगता होते .सायंकाळी पुन्हा देवीचे पादप्रक्षालन, नेवेद्य, धुपारती होऊन श्रींना मुखवस्त्र दिले जाते व मंदिर बंद होते.