विकास प्रकल्पना गती देण्याचे महापालिका प्रशासनाला निर्देश…
पुणे :
पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेत शहरातील सद्यस्थितीतील विकासप्रकल्प तसेच नागरी समस्यांसंदर्भात आढावा घेतला. यात प्रामुख्याने समान पाणीपुरवठा, रस्ते, पूल, वाहतूक, एचटीएमआर, शहरातील अतिक्रमणे, नदीपुनर्रुज्जीवन, नदीकाठ सुधार, प्रधानमंत्री आवास योजना, समाविष्ट गावातील प्रस्तावित प्रकल्प अशा विविध विषयांवर बैठकीत प्रदीर्घ चर्चा झाली. तसेच आता प्रत्येक महिन्याला आढावा बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.
बैठकीतील प्रमुख मुद्दे…
२४X७ समान पाणीपुरवठा योजना
२४x७ समान पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत शहरातील ८८ पैकी ६६ पाण्याच्या टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. तसेच २२ टाक्यांचे काम प्रगतीपथावर असून ते जून २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे. तसेच १०२ पैकी ९२ किलोमीटरच्या मोठ्या व्यासाच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. तसेच १,२२४ पैकी ९६७ वितरण नलिकांची कामे पूर्ण झालेली आहेत. ५ पैकी ३ पंपिंग स्टेशनची कामे पूर्ण झाली असून २ लाख ३२ हजार वॉटर मीटरपैकी १ लाख ६८ हजार मीटर बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. २४x७ पाणीपुरवठा योजना पालिका हद्दीत नव्याने समाविष्ट गावांमध्ये देखील सुरू करण्यात आली आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर पाण्याची गळती थांबून संपूर्ण पुणे शहराला समान आणि पुरेसा पाणीपुरवठा होणार आहे.
नदी पुनरुज्जीवन योजना
नदी पुनरुज्जीवन योजनेअंतर्गत ११ पैकी ९ HTP प्लांट पूर्ण झाले आहेत. तसेच ५३ पैकी ६ किलोमिटरची प्रमुख लाईन पूर्ण झाली असून त्याला वेग देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून येणारा निधी टप्प्या-टप्प्याने येत आहे. या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
नदीकाठ सुधार प्रकल्प
मुळा-मुठा नदीचा ४४ किलोमीटरचा एकूण नदीकाठचा टप्पा असून यातील ३.७ किलोमीटरचे सध्या काम सुरू आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे…
प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून पुणे शहरात पहिल्या टप्प्यात २,६०० घरे नागरिकांना मिळाली आहेत. याचसोबत दुसऱ्या टप्प्यात शहरात विविध ५ ठिकाणी या योजनेअंतर्गत ४,१७५ घरांची निर्मिती सुरू आहे. हे सर्व प्रकल्प प्रगतीपथावर आहेत.
पूर नियंत्रणासाठी केंद्राचा ‘अर्बन फ्लड कंट्रोल’ निधी…
केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या माध्यमातून अर्बन फ्ल्ड कंट्रोल अंतर्गत पुणे शहराला २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून यातील ७५ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारला प्राप्त झाला आहे.
शहरातील खड्ड्यांबाबत…
पुणे शहरातील २० हजार खड्डे बुजवले आहेत, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. याबाबत आढावा घेत येत्या काळात शहरातील सर्व खड्डे बुजविण्यासाठी काम करण्यास सांगितले आहे. शहरातील ३३ पैकी १५ प्रमुख रस्त्यांचे येत्या ३० जानेवारीपर्यंत रि-सर्फेसिंग करण्याच्या सूचना दिल्या. तसेच पुढील टप्प्यात १७ रस्त्यांचे करण्याच्या सूचना
विविध रस्त्यांची प्रलंबित कामे…
- शिवणे-खराडी रस्ता लवकरात लवकर करण्यासाठी भूसंपादन आवश्यक असून यासाठी राज्य सरकार मदत करणार आहे.
- कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी १४० कोटी रुपयांना मंजुरी दिली असून याची भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
- HTMTR बाबत लवकरच माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यात येईल.
अतिक्रमणासंदर्भात…
कोणाच्याही दबावाला न जुमानता फुटपाथ मोकळे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. लोक रस्त्यांवर झोपड्या टाकून राहत असून यावर ही तातडीने कारवाई करण्याच्या सूचना केल्या.