भाजीपाल्याचा टेम्पो पलटी ; सहा जखमी
उरुळी कांचन :
उरुळी कांचन-
जेजुरी रस्त्यावर भाजीपाल्याने भरलेला टेम्पो पलटी होऊन सहा जण जखमी झाले . जखमींमध्ये चार पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे.
मंजू संतोष खराडे (वय ३९, रा. शिंदवणे रोड, उरुळी कांचन) या गंभीर जखमी झाल्या असून, संतोष रामा गायकवाड (वय २९), शिवाजी मोतीराम जाधव (वय ३२), लिंबाजू मोतीराम जाधव (वय २१), रोहिणी सतीश शिंदे (वय २६) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. हा अपघात रविवारी (दि. ०२) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल ग्रॅण्ड नाईन समोरून पालक भाजी घेऊन जाणारा टेम्पो वेगात जात असताना अचानक चालकाचा ताबा सुटला आणि टेम्पो रस्त्यावर पलटी झाला. या अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि काही काळ वाहतूक ठप्प झाली.
अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक नागरिक व प्रवाशांनी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले. तत्काळ कदम रुग्णवाहिकेचे वैभव कदम व स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून सर्व जखमींना उरुळी कांचन येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार सुरू केले असून, काहींची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, टेम्पोचा वेग जास्त असल्याने चालकाचा ताबा सुटल्यामुळे तो पलटी झाला असण्याची शक्यता आहे. अधिकृत तपासानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल. उरुळी कांचन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविले, तसेच वाहतूक सुरळीत केली.