पूर्ववैमनस्यातून गोळीबार करीत तलवारीने सपासप वार करुन तरुणाचा खून;
कोथरूड : केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्याला भर चौकात मारहाण केल्याचा प्रकार ताजा असताना रविवारी मध्यरात्री गुंडाच्या टोळक्याने गोळीबार करत तलवार, कोयत्याने सपासप वार करुन एका तरुणाचा निर्घण खुन केल्याचा प्रकार समोर आला आहे.

गौरव अविनाश थोरात (वय २२, रा. शास्त्रीनगर, कोथरुड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी काही गुन्हेगारांची धरपकड केली आहे.

याबाबत सागर वसंत कसबे (वय ४७, रा. पी एम सी कॉलनी, कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दिनेश भालेराव (वय २७), सोहेल सय्यद (वय २४), राकेश सावंत (वय २४), साहिल वाकडे (वय २५), बंड्या नागटिळक (वय १८) लखन शिरोळे (वय २७) अनिकेत उमाप (वय २२) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव थोरात आणि आरोपी यांच्यामध्ये यापूर्वी भांडणे झाली होती. गौरव थोरात हा शास्त्रीनगर येथील दत्त मंदिराजवळ मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. यावेळी सोहेल सय्यद व त्याचे साथीदार तेथे आले.

सोहेल याने गौरवच्या दिशेने गोळी झाडली. ती गोळी गौरवला लागली नाही. त्यानंतर टोळक्याने तलवार, सत्तूर, कोयत्याने गौरव याच्या मान, डोके, पोटावर व पायावर वार करुन गंभीर जखमी करुन त्याचा खून केला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पठारे, अजय परमार, राजेंद्र मुळीक, गणेश इंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप देशमाने, पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली.

पोलिसांनी घटनास्थळावरुन गावठी पिस्टल, तलवार, सत्तुर जप्त केले आहे. गौरव थोरात याच्या खुन प्रकरणी काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कारवाई सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप देशमाने यांनी सांगितले