Blog

नोबल हॉस्पिटल्स तर्फे महाराष्ट्रातील पहिली एसएसआय मंत्रा 3 रोबोटिक प्रणाली स्थापित

हडपसर : नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरमध्ये महाराष्ट्रातील पहिली एसएसआय मंत्रा 3 रोबोटिक प्रणाली स्थापित करण्यात आली आहे. ही एक प्रगत नाविन्यपूर्ण प्रणाली असून शस्त्रक्रिये दरम्यान अचूकता आणि कार्यक्षमता सुधारणे हा याचा उह्ेश्य आहे. सुप्रसिध्द मराठी अभिनेते प्रसाद ओक यांच्या हस्ते या प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.दिलीप माने, कार्यकारी संचालक डॉ.एच के साळे, मगरपट्टा टाऊनशिप डेव्हलपमेंटचेे अध्यक्ष सतीश मगर, नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ.दिविज माने,शल्यचिकित्सक डॉ.उमेश पप्रुनिया, कर्करोग तज्ञ (आँकोसर्जन) डॉ.आशिष पोखरकर आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ उपस्थित होते.

या एसएसआय मंत्रा रोबोटिक प्रणाली मध्ये रोबोटिक शस्त्रक्रियेतील नाविन्यपूर्ण तंत्रांचा समावेश करण्यात आला असून यामध्ये पाच आटोपशीर रोबोटिक आर्म्स,शल्य चिकित्सकांसाठी अद्वितीय प्रतिमा प्रदान करणारे इमर्सिव्ह थ्रीडी एचडी हेडसेट,संपूर्ण सर्जिकल टीमसाठी 3डी 4के इमेजिंग प्रदान करणारे व्हिजन कार्ट यांचा समावेश आहे.

प्रमुख पाहुणे व अभिनेते प्रसाद ओक म्हणाले की हे रोबोटीक तंत्रज्ञान पाहून मी भारावून गेलो. कॉलेज मध्ये असतांना 90 च्या दशकात रोबो डान्सचे फॅड होते, त्यानंतर रजनीकांत चा आलेला रोबोट हा चित्रपट आणि आता वैद्यकीय क्षेत्रात रोबोटिक प्रणाली हा तंत्रज्ञानाचा प्रवास थक्क करणारा आहे .ही यंत्रणा मी प्रत्यक्षात पहिली व अनुभवली, त्यातील अचुकतेमुळे डॉक्टरांचे काम सोपे होते आणि जेव्हा डॉक्टरांचं काम सोपे होते तेव्हा रुगणाच्या मनावरचा भार कमी होते. हे तंत्रज्ञान विकसित करून डॉक्टर मोठे योगदान देत आहेत .

नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे आँकोसर्जन डॉ.आशिष पोखरकर म्हणाले की, ही रोबोटिक यंत्रणा सर्जिकल तंत्रज्ञानाच्या नव्या युगाची सुरूवात आहे. या रोबोटिक प्रणालीचा वापर सामान्य शस्त्रक्रिया,हृदय व छातीच्या पोकळीतील विकार (कार्डिओथोरॅसिक),मुत्रविकार,स्त्री रोग अशा अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसह रूग्णांसाठी जीवनदायी प्रक्रिया म्हणून काम करेल. नुकतेच आम्ही या प्रणालीचा वापर करून आमची पहिली शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.या शस्त्रक्रियेमध्ये कोलन कार्सिनोमाचे (मोठे आतडे किंवा गुदाशयात सुरू होणारा कर्करोग) निदान झालेल्या रूग्णावर रोबोटिक राईट एक्स्टेंडेड हेमिकोलेक्टोमी प्रक्रिया करण्यात आली.

नोबल हॉस्पिटल चे कार्यकारी संचालक डॉ. एच के साळे म्हणाले की,या तंत्रज्ञानामध्ये छोट्या उपकरणांद्वारे देखील बोटांच्या टोकाच्या आकाराएवढे कमीत कमी छेद केल्यामुळे रूग्ण लवकर बरे होण्याची प्रक्रिया जलद होऊ शकते. लॅप्रोस्कोपिक आणि खुल्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत या छोट्या उपकरणांच्या हालचालीचे कार्यक्षेत्र अधिक चांगले असते.

नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.दिलीप माने म्हणाले की, रोबोटिक प्रणाली ही निरंतर प्रगतीच्या मार्गावर जाण्याच्या आमच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. ही रोबोटिक प्रणाली नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची आणि उपचार परिणाम व रूग्ण अनुभव सुधारण्याची आमची वचनबध्दता दर्शविते.

नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ.दिविज माने म्हणाले की,मागील वर्षी आरोग्यसेवा क्षेत्रातील सर्वोच्च मानांकन समजले जाणारे जेसीआय सील प्रमाणन प्राप्त करणारे नोबल हॉस्पिटल हे पुण्यातील पहिले रूग्णालय ठरले.यावर्षी अद्ययावत ह्युमन मिल्क बँक आणि आता रूग्णांना कमीत कमी छेद वापरून वेदना विरहित उपचार करणारी रोबोटिक प्रणाली कार्यान्वित केली आहे. आरोग्यसेवेमध्ये सातत्याने उच्च गुणवत्ता राखत डॉक्टरांना मदत होईल आणि रूग्णांना फायदेशीर ठरेल असे नवनवीन तंत्रज्ञान अंगीकृत करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

डॉ.दिलीप माने म्हणाले की,रूग्ण उपचारामध्ये उत्कृष्टता आणि चांगले परिणाम साध्य करण्यासाठी समर्पित असलेल्या डॉक्टर्स,परिचारिका आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचे मी अभिनंदन करतो.

Related Articles

Back to top button