अजिंक्य जगताप याची पुणे- प्रयागराज सायकलवारी….

हडपसर ,
सध्या राहणार हडपसर ,मूळ गाव – बेलसर (ता. पुरंदर) येथील सुपुत्र अजिंक्य सुनील जगताप यांनी पुणे ते प्रयागराज, असा १,५७१ किलोमीटरचा प्रवास साधारणपणे प्रति दिवस २२४ या प्रमाणे अवघ्या सात दिवसांमध्ये पूर्ण केला.

तो कामानिमित्ताने हडपसर येथे राहत असून तेथून कोथरूड येथे ऑफिसमध्ये नियमित ३३ किलोमीटर ये-जा तर दर शनिवारी गावी बेलसर येथेही सायकलनेच येणे. त्यामुळे त्याने मोठ्या आत्मविश्वासाने ही मोहीम पूर्ण केली. त्याने बेलसर गावच्या नावलौकिकात भर टाकण्याचा प्रयत्न केल्याने त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

ही कामगिरी पूर्ण करून नुकतेच त्याचे बेलसर येथे आगमन झाले. त्याने प्रयागराज येथील कुंभमेळा, हरिद्वार, महाकाल परिक्रमा पूर्ण केल्याने ग्रामस्थांच्या वतीने पारंपारिक वाद्याच्या गजरात त्याचे वाजत गाजत जंगी मिरवणुकीने स्वागत केले. महाकुंभ प्रयागराज येथे होणार असल्याचे समजले, त्याचवेळी त्याने ठरवले की प्रयागराजला जायचे अन् तेही सायकलवर… त्याप्रमाणे १२ फेब्रुवारीला होणाऱ्या शाही स्नानासाठी त्याला पोहोचायचे तेही सोळाशे किलोमीटरचे अंतर त्याला आठ दिवसांमध्ये पूर्ण करायचे होते. याप्रमाणे राहण्यासाठी टेट आणि झोपण्यासाठी स्लिपिंग बॅग, थोडे कपडे, सोबतच पाण्याच्या बाटल्या आणि आईने बनवलेले शेंगदाण्याचे लाडू घेऊन, त्याने ३ तारखेला रात्री १२ वाजता प्रवासाला सुरुवात केली.

उन्हापासून वाचण्यासाठी त्याने संपूर्ण प्रवास रात्रीचा करीत नाशिक, धुळे, मध्यप्रदेश इंदोर, उज्जैन (येथे
महाकाल यांची भस्म आरती, कालभैरव आरतीमध्ये सहभाग), भोपाळ, कटनी, केमोरे, असा एक-एक टप्पा पार करीत सात दिवसांमध्ये, १० फेब्रुवारी रोजी प्रयागराज येथे तो पोहोचला. पोहोचल्यानंतर त्रिवेणी संगमावरती पवित्र स्नान, नागा साधूचे दर्शन घेत कुंभमेळा पाहिला. २४ तास प्रयागराज येथे थांबून पुढे अयोध्या प्रवास केला.

या प्रवासामध्ये एका टप्प्यावर पाच ते सहा तास जंगलामधून रात्रीचा प्रवास करायचा होता. स्थानिकांच्या माहितीनुसार त्या जंगलांमध्ये वाघ, बिबट्या, लांडगे, अस्वल, आणि बरेच जंगलो श्वापदे आढळतात, जिथे रात्री टू व्हीलर स्वार जाण्यास घाबरतात तेथून त्याला सायकलवरती जायचे होते. त्या रस्त्यांवरूनही सुखरूप प्रवास झाल्याचेही त्याने आवर्जून सांगितले. पुढे अयोध्येला जाताना सायकल व्यवस्थित चालत नव्हती, तसाच त्या बीना ब्रेकच्या सायकल वरती हळूहळू अयोध्या अंतर पुणे केले.

हनुमानघडीचे, श्रीराम मंदिराच्या कळसाचे दर्शन घेत, राम रसोईमध्ये प्रसादाचे जेवण करून त्याने परतीच्या प्रवास केला. या प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी मित्रांच्या मदतीने निवासाची व्यवस्था झाल्याने त्यांनी त्यांचे आभार मानले.