बचत गटांच्या महिलांचे ‘या’ साठी महापालिकेसमोर आंदोलन
हडपसर : महागाई प्रचंड वाढली असतानाही गेल्या बारा वर्षांपासून पोषण आहार पुरविणाऱ्या महिला बचत गटांच्या मानधनात वाढ होऊ शकली नाही. सध्या मिळणारे पोषण आहाराचे मानधन तुटपुंजे असून, ते वाढवून मिळावे, या मागणीसाठी हडपसर-मांजरी परिसरातील महिलांनी महापालिकेसमोर आंदोलन केले.
अखिल मांजराईनगर नागरिक कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. नागरवस्ती विकास योजनेच्या माध्यमातून महापालिका हद्दीतील बालवाड्यांमध्ये शालेय पोषण आहार बचत गटांमार्फत दिला जातो. त्यासाठी प्रतिविद्यार्थी सहा रुपये मानधन बचत गटांना दिले जात आहे.
मात्र, गेल्या बारा वर्षांपासून या मानधनात वाढ झालेली नाही. कृती समितीचे -अध्यक्ष राजेंद्र साळवे यांच्यासह महिलांनी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.
शिक्षण मंडळ व समाज विकास विभाग यांच्याकडून त्याबाबत अहवाल मागविला जाईल. त्याचा अभ्यास करून मानधन वाढवून देण्याबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.- राजेंद्र भोसले, आयुक्त, महापालिका