टाकी फोडत असताना स्फोट: कामगाराचा मृत्यु
हडपसर :भंगाराच्या दुकानात आलेली टाकी फोडत असताना तिचा स्फोट होऊन त्यात एका कामगाराचा मृत्यु झाला असून तिघे जण जखमी झाले आहेत. ही घटना बी टी कवडे रोडवर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली .
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मेहमूद शेख (वय ५०, रा. रामनगर, रामटेकडी) याचा मृत्यु झाला आहे. किशोर साळवे (वय ४०), दिलीप मिसाळ (वय ४०) आणि महंमद सय्यद (वय ५०) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत , बी टी कवडे रोडवर महंमद सय्यद यांचे भंगाराचे दुकान आहे. या दुकानात एक सिलेंडरसारखी छोटी टाकी आली होती.
ही टाकी मेहमुद शेख हा फोडत होता. त्यावेळी या टाकीचा स्फोट झाला. डोके खाली करुन मेहमुद शेख टाकी फोडत असल्याने टाकीचा स्फोट झाल्यावर त्याच्या डोक्याच्या चिंधड्या उडाल्या. त्याच्या शेजारी असलेली इतर तिघे टाकीचे तुकडे लागून जखमी झाले.
टाकी फुटल्याचा आवाज येताच आजू बाजूचे लोक धावुन आले. त्यांनी जखमी कामगारांना तातडीने ससून रुग्णालयात रवाना केले. अग्निशमन दलाचे जवान, मुंढवा पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिस अधिक माहिती घेत आहेत.