संपादकीय

अग्रलेख : भाषेची तहान…

समृद्ध परंपरा जपतानाच इतर भाषांमधले शब्द आत्मसात करत आणखी श्रीमंत होत गेलेल्या मराठीने जगण्यामधले नवे प्रवाहही सामावून घेणे थांबवले आहे की समाजमाध्यमांच्या जमान्यातही १७० वर्षांपूर्वीचा एखादा शब्द ‘या वर्षीचा’ म्हणून नव्या अर्थाने येतो, हे भाषेचे प्रवाहीपण!

‘ब्रेन रॉट’ हा शब्द ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसचा ‘या वर्षाचा शब्द’ (वर्ड ऑफ द इयर २०२४) आहे, या संदर्भाचे महत्त्व भाषेवर मन:पूत प्रेम असल्याशिवाय कळू शकत नाही आणि जो हे असे प्रेम करतो त्याला खरे तर भाषा ही किती सुंदर गोष्ट आहे, हे फक्त समजलेलेच नाही, तर उमगलेलेही असते. त्या बाबतीत आपली कथा काय वर्णावी? कारण ‘शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन’ असे म्हणणाऱ्या तुकोबांची परंपरा सांगणाऱ्या मराठी माणसाने आपली भाषा इंग्रजी आणि हिंदीच्या दावणीला कशी बांधली आहे, याचे दाखले रोजच्या रोज मिळत असतात. आपल्या लहानग्याला बालवाडीऐवजी ‘प्ले ग्रुप’मध्ये घालून तिथपासूनच मराठी भाषेच्या नष्टचर्याची पालखी वाहणाऱ्या मराठी माणसाला स्वभाषेचा न्यूनगंड वाटतो, हे काही लपून राहिलेले नाही. आपल्याच माणसांकडून अशी अवहेलना जगात इतर कोणत्या भाषेच्या वाट्याला क्वचितच येत असेल. भाषेवर प्रेम करणारे आणि तिचे पांग फेडू इच्छिणारे मात्र भाषेशी मराठी माणसासारखे वागत नाहीत. त्यांचे भाषेच्या प्रांतात चालणारे प्रयोग हे त्यांना लागलेल्या भाषेच्या तहानेचे द्योतक आहेत. त्याचे एक उदाहरण म्हणजे १९७१ मध्ये जर्मन भाषेत सुरू झालेली ‘या वर्षीचा शब्द’ म्हणजेच ‘वर्ड ऑफ द इयर’ ही परंपरा. ती हळूहळू इतर देशांमध्ये, इतर भाषांमध्ये पसरत गेली. त्या त्या वर्षी सगळ्यात जास्त प्रमाणात वापरल्या गेलेल्या शब्दाची दखल या ‘वर्ड ऑफ द इयर’ उपक्रमातून घेतली जाते. त्यातून त्या वर्षातली लोकांची मानसिकता, त्यांचा कल, त्या वर्षभरातील चर्चाविश्व, बदलत चाललेले जग या सगळ्याचा आवाका उमगतो. आता तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसशिवाय कोलिन्स, केम्ब्रिज, मरियम-वेबस्टर डिक्शनरी, डिक्शनरी डॉट कॉम या वेगवेगळ्या शब्दकोश निर्मिती संस्थांकडून त्यांच्या दृष्टीने त्या त्या वर्षात कोणता शब्द महत्त्वाचा ठरला ते प्रसिद्ध केले जाते. त्यांच्या मते तो शब्द त्या वर्षभरात या शब्दकोशांमध्ये सगळ्यात जास्त शोधला गेलेला असतो आणि सगळ्यात जास्त वापरला गेलेला असतो.

तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसचा या वर्षीचा मानकरी आहे ‘ब्रेन रॉट’ हा शब्द. हा शब्द आजकाल तयार झालेला, वापरात आलेला असेल असे वाटावे तर तसेही अजिबात नाही. या शब्दाचा वापर १७० वर्षांपूर्वी हेन्री डेव्हिड थोरोच्या ‘वॉल्डन’ या पुस्तकात झाला होता. ‘बटाट्यांचे सडलेपण कमी करण्यासाठी समाज प्रयत्न करतो आहे, तर मेंदूचे सडलेपण कमी करण्यासाठी का प्रयत्न करत नाही? मेंदूचे सडलेपण हा आजार तर जास्त पसरलेला आणि जीवघेणा आहे.’ असे त्यांनी आपल्या पुस्तकात म्हटले होते. म्हणजे मेंदूच्या सडण्याविषयीचा हा स्पष्ट आणि थेट उल्लेख होता. पण १७० वर्षांनंतर मात्र तो अगदी आजच्या, ताज्या संदर्भात वापरला गेला आहे. तो संदर्भ आहे समाजमाध्यमांचा. हातात मोबाइल घेऊन समाजमाध्यमांवर सर्फिंग करत बसलेल्यांच्या नजरेसमोर अत्यंत सुमार दर्जाची रील्स एकामागून एक येत राहतात आणि तो किंवा ती ही रील्स कसलाही विचार न करता तासनतास बघत राहतात. जिचा मेंदू सडलेला आहे आणि आता ती विचार करू शकत नाही, अशी व्यक्तीच अशा पद्धतीने हा सामान्य कंटेण्ट पाहण्यासाठी आपला वेळ वाया घालवू शकते, अशा अर्थाने ‘ब्रेन रॉट’ हा शब्द गेल्या वर्षभरात २३० टक्के वेळा वापरला गेला म्हणे. ‘डेम्यूर’, ‘स्लोप’, ‘डायनॅमिक प्रायसिंग’, ‘रोमँटसी’ आणि ‘लोर’ या पाच शब्दांना मागे टाकत ३७ हजार लोकांनी ‘ब्रेन रॉट’ या शब्दाला ‘या वर्षा’चा शब्द म्हणून पहिली पसंती दिली. आता मेंदू अशा पद्धतीने खरोखरच सडतबिडत नाही, हे सगळ्यांनाच माहीत असते, पण थोरोने वापरलेला हा शब्द आजच्या समाजमाध्यमांच्या अतिरेकी वापराशी जोडून समाजाला आरसा दाखवण्याचे काम करणारे डोके खरोखरच सुपीक म्हणायला हवे. जाता जाता सांगायचे म्हणजे याआधी ‘रिज’, ‘गॉब्लिनमोड’, ‘सिच्युएशनशिप’, ‘पॅरासोशल’ हे शब्द ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसचे त्या त्या वर्षाचे मानकरी ठरले होते.

कोलिन्स डिक्शनरीचा २०२४ या वर्षाचा शब्द आहे ‘ब्रॅट’. स्वतंत्र, आत्मविश्वासपूर्ण भोगवादी व्यक्ती या अर्थाने तो वापरला गेला आहे. ‘ब्रॅट’ हा शब्द याआधीही शब्दकोशामध्ये होताच, पण तो द्वाड किंवा वांड मूल (बहुतेकदा मुलगाच), टग्या बापाचे पोर यासंदर्भात वापरला जात असे. एक्ससीएक्स या गायिकेच्या याच नावाच्या अल्बमपासून प्रेरणा घेऊन तो समाजमाध्यमांमध्ये नव्या अर्थाने वापरला जायला लागला. हा शब्द ‘अँटी टुरिझम’, ‘रोमँटसी’, ‘सुपर मेजॉरिटी’ या शब्दांशी स्पर्धा करत कोलिन्स डिक्शनरीत यंदा मानाचे पान पटकावून बसला; तर ‘शेफ्स किस’, ‘बूप’ या शब्दांना मागे सारून केम्ब्रिज डिक्शनरीत ‘मॅनिफेस्ट’ या शब्दाने बाजी मारली. खरे तर हा शब्द अजिबातच नवीन नाही. पण जेन झी (१९९० ते २००० च्या दरम्यान जन्मलेली पिढी) एखादे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ते सतत डोळ्यासमोर ठेवणे या अर्थाने समाजमाध्यमांमध्ये तो सतत वापरत असल्यामुळे तो ‘वर्ड ऑफ द इयर’ ठरला आहे. तर पारलिंगी टिकटॉक-स्टार जूल्स लेब्रॉनने तिच्या व्हीडिओत वापरलेला ‘डेम्यूर’ हा शब्द डिक्शनरी डॉट कॉमने ‘या वर्षा’चा शब्द ठरवला आहे. एरवी ‘मर्यादशील’ या अर्थाने तो वापरला जात असला तरी लेब्रॉनने तो एखाद्या व्यक्तीच्या सामाजिक वावराचे वर्णन या अर्थाने वापरला आणि तो त्याच अर्थाने वर्षभर समाजमाध्यमांमध्ये रूढ झाला. इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, डेन्मार्क, नॉर्वे, पोर्तुगाल, स्पेन, स्वित्झर्लंड, रशिया, युक्रेन, जपान अशा वेगवेगळ्या देशांमध्ये भाषेचे प्रवाहीपण जोखणारा आणि अधोरेखित करणारा हा ‘वर्ड ऑफ द इयर’चा प्रयोग गेली काही वर्षे केला जातो आहे. या वर्षाचे म्हणून निवडल्या गेलेल्या काही निवडक शब्दांवर नजर टाकली असता लक्षात येतो तो समाजमाध्यमांचा प्रभाव. ‘ब्रेन रॉट’ हा शब्द समाजमाध्यमांच्या अतिरेकी वापरावरच टिप्पणी करतो, तर बाकीचे शब्दही या ना त्या संदर्भात गेल्या वर्षभरात या माध्यमांवर मुळातल्यापेक्षा वेगळ्या अर्थाने रूढ झाले. आजचे सगळे जगणे व्यापून टाकणारा समाजमाध्यमांचा भस्मासुर या भाषांच्या बाबतीत मात्र नव्या पिढीबरोबर नवे अर्थ घेऊन येतो हे कोडे काहीसे न उलगडणारेच म्हणायला हवे. हे इतर भाषांच्या बाबतीत होत असेल तर मायमराठीच्या बाबतीत का होऊ नये? की शब्दांना नवनवे अर्थ प्रसवण्याइतका प्रवाहीपणा मराठी भाषेमध्ये आता उरलेलाच नाही? थोरोचा एखादा शब्द १७० वर्षांनंतरही तरुण पिढीला आपलासा वाटू शकतो, तर आपल्या ज्ञानेश्वरांचा एखादा शब्दही नव्या काळाचा नवा साज घेऊन का अवतरू नये? एके काळी आपली समृद्ध परंपरा जपतानाच इतर भाषांमधले शब्द आत्मसात करत आणखी श्रीमंत होत गेलेल्या मराठीने जगण्यामधले नवे प्रवाहही सामावून घेणे थांबवले आहे की काय? इतर भाषांमध्ये ‘या वर्षी’ सगळ्यात जास्त वापरलेला शब्द कोणता ते तपासण्याची, शोधण्याची प्रेरणा असू शकते, तर तीच तहान मराठी भाषकांनाही का लागू नये? स्वत:च्या भाषेबद्दल कमालीची अनास्था हेच मराठी माणसाचे व्यवच्छेदक लक्षण का झाले आहे? आपल्या भाषेचे पूर्वसंचित जपून ठेवण्याचे भान नसणे हे मराठी माणसाचे ‘ब्रेन रॉट’च नाही का?

Back to top button