राजकीय

शपथविधी होताच मंत्रालयात; घेतला पहिला मोठा निर्णय


मुंबई,
मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा महाशपथविधी सोहळा अगदी दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह एनडीएतील राज्यांचे मुख्यमंत्री, दिग्गज उद्योगपती, अभिनेते-कलाकार, क्रिकेट विश्वातील मंडळी, संत-महंत तसेच हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

आझाद मैदानावरील भव्य-दिव्य शपथविधी सोहळ्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय गाठले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित होते. या तिघांनी मंत्रालयात राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना तसेच संविधान उद्देशिकेला अभिवादन केले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाल्याची महिती देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात पोहोचताच अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर स्वाक्षरी केली. पुणे येथील रुग्ण चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारांसाठी ५ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली.

दरम्यान, पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. तसेच काही निर्देशही दिल्याचे सांगितले जात आहे. जी आश्वासने दिली आहे, त्या दृष्टीने पावले उचलायची आहेत. आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. लोकाभिमुख सरकार देण्याचा प्रयत्न करू, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तसेच आमदारांना शपथ देण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले जाणार आहे.

Back to top button